पर्यटनस्थळी सर्कसला संधी द्या
केंद्र व राज्य सरकारांची मदत हवी
– सुजित दिलीप
26 नोव्हेंबर हा भारतीय सर्कसचा जन्मदिवस असून 136 वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या भारतीय सर्कसला केंद्र व राज्य सरकारने आधार दिला पाहिजे. देशातील विविध पर्यटनस्थळी कायमस्वरूपी सर्कस शो करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, आंतरराष्ट्रीय सर्कस देशात आणून भारतीय सर्कस समवेत त्यांचे एकत्रित शो संपूर्ण वर्षभर तेथे चालू ठेवणे, प्रत्येक राज्यात कौशल्यविकास योजनेअंतर्गत सर्कसशाळा सुरू करून सर्कसमधील कलाकसरतींचे प्रशिक्षण देणे, प्रमुख शहरांमध्ये सर्कस महोत्सव भरवणे, वस्तीत येणार्‍या वाघ, बिबट्यांना सर्कसमध्ये संगोपनासाठी ठेवणे अशा प्रकारे केंद्र व राज्य सरकार सर्कस उद्योगाला मदत करू शकेल व त्यायोगे खंगत चाललेल्या भारतीय सर्कस उद्योगाला चालना मिळेल व सर्कस कला जिवंत राहण्यास मदत होईल असे मत रॅम्बो सर्कसचे चालक सुजित दिलीप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांनी 26 नोव्हेंबर 1882 मध्ये मुंबईतील बोरिबंदर येथे ‘ग्रँड इंडियन सर्कस’चा पहिला शो केला आणि भारतीय सर्कसचा जन्म झाला. त्यास यंदा 136 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच जागतिक सर्कसचे देखील यंदा 250वे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर सुजित दिलीप बोलत होते.
ते म्हणाले, पुण्यात सध्या मगरपट्टा-मुंढवा परिसरात रॅम्बो सर्कस चालू असून सोमवार दि. 26 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 1.30 वाजता सर्व सर्कस कलावंतांसमवेत भारतीय सर्कसचा जन्म दिवस साजरा केला जाईल. विष्णुपंत छत्रेंच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण केल्यानंतर विष्णुपंत छत्रेंच्या घराण्याचे वारस सौ. कल्पना व अजय छत्रे, आंतरराष्ट्रीय सर्कसपटू दामू धोत्रे यांचे नातू विलास धोत्रे, ‘सर्कस-सर्कस’ पुस्तकाच्या लेखिका कै. श्यामला शिरोडकर यांची कन्या जानकी मोरे, ‘सर्कस विश्व’ आणि ‘वर्ल्ड ऑफ सर्कस’चे लेखक प्रवीण प्र. वाळिंबे यांचे सत्कार करण्यात येणार आहेत.
ते पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय सर्कस कलावंतांचा समावेश असणारी ‘सर्क्यू दु सोलेल’ (Cirque du Soliel) ही नामवंत सर्कस मुंबईत वांद्रा, कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरू झाली असून, याचे जनक कॅनडाचे ‘गाय लालीब्रेट’ (Guy Laliberte) यांनी जगातील 35 देशांमधील सर्कस कलावंतांना एकत्र करून ‘सर्क्यू दु सोलेल’ (Cirque du Soliel) या नावाने अनेक सर्कस प्रॉडक्सन तयार केले व जगात अनेक शहरांमध्ये त्यांचे प्रयोग सुरू आहेत. अतिशय आधुनिक तंत्रज्ञान, लाईट इफेक्टस् या समवेत या आंतरराष्ट्रीय सर्कसपटूंच्या कसरतींना मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे ही आनंदाची बाब आहे. त्यांनी युरोप, अमेरिकेत सर्कस कलावंतांना प्रशिक्षण देण्यासाठी सर्कस शाळा सुरू केल्या. तसेच तेथील पर्यटन स्थळांपाशी कायम स्वरूपी सर्कस शो चालू ठेवले. याच धर्तीवर आपल्या देशातही पर्यटन स्थळांजवळ कायम स्वरूपी सर्कस शो होण्याची व्यवस्था व्हायला हवी. आता आंतरराष्ट्रीय सर्कस देखील भारतात येण्यास सुरूवात झाल्यामुळे भारतीय व आंतरराष्ट्रीय सर्कसच्या कलावंतांचे एकत्रित शो पर्यटनस्थळी निश्चित आकर्षण बनतील. त्यामुळे सर्कस कलावंतांना वर्षभर रोजगार मिळून भारतीय सर्कस उद्योगाला चालना मिळेल. तसेच कौशल्यविकास (स्किल इंडिया) अंतर्गत प्रत्येक राज्यात सर्कस शाळा सुरू केल्यास त्यातूनही दर्जेदार सर्कस कलावंत निर्माण होऊ शकतील. केरळमधील त्तेलिचेरी येथे सुरू झालेली सर्कसशाळा आता बंद असून तेथेही आर्थिक मदत देऊन ही सर्कसशाळा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी देशातील सर्कस उद्योगही निश्चित योगदान देईल असे ते म्हणाले.
सध्या जंगलातून वस्तीकडे वाघ, बिबट्या येण्याचे प्रमाण वाढले असून नुकतेच नरभक्षक बनलेल्या वाघिणीला ठार मारण्यात आले. या दुर्मिळ प्राण्यांना न मारता बिबट्यासारखे प्राणी देशातील सर्कसला दिल्यास त्यांचे संगोपन सर्व प्रकारच्या सोयी सुविधांसह सर्कस चालक करू शकतील. त्यामुळे सर्कसला देखील उर्जित अवस्था येऊ शकेल असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *