श्री समेद शिखरजी बचाओ अभियान
दि. 15 ऑक्टोबर रोजी जैन समाजाचा पुण्यात भव्य मोर्चा
झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे पवित्र धार्मिकस्थळ असणार्‍या श्री समेद शिखरजी आता पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरूद्ध संपूर्ण देशातील जैन धर्मियांनी ‘श्री समेद शिखरजी’ बचाओ अभियान सुरू केले आहे. श्री समेद शिखरजी जैन धर्मियांचे पूजाक्षेत्र (Place of Worship) म्हणून अधिकृत रित्या घोषीत करावे. व येथे पर्यटन विकास करू नये. या मागणीसाठी पुण्यातील सर्व जैन धर्मियांतर्फे ‘श्री समेद शिखरजी’ बचाओ अभियान अंतर्गत सोमवार दि. 15 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता ओसवाल बंधू समाज कार्यालय, सेवन लव्हज् चौक येथून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. जैन समाजाचा हा शांततामय विराट मोर्चा तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचेल व जिल्हाधिकार्‍यांना या संदर्भातील पुण्यातील जैन समाजातर्फे निवेदन दिले जाईल. यामध्ये जैन धर्मियांचे दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी आणि तेरापंथी अशा सर्व उपपंथांचे जैन बंधू भगिनी व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
पूर्वी बिहार आणि आता झारखंड राज्यात असणार्‍या जैन धर्मियांच्या श्री समेद शिखरजी या पवित्र धर्मस्थळी 24 पैकी 20 तीर्थंकारांनी निर्वाण केले असून कोट्यावधी जैन मुनींनी तेथे तपश्चर्या करून मोक्ष प्राप्त केला आहे. केवळ देशातीलच नव्हे तर जगातील जैन भावीक आयुष्यात एकदा तरी श्री समेद शिखरजी येथे जातोच. एकूण 27 किमीची पहाडावरील मार्गक्रमणा प्रत्येक जैन भाविक अनवाणी करत असतो. मोगल आणि ब्रिटीश राजवटीतही श्री समेद शिखरजी बाबत जैन धर्मियांच्या असणार्‍या भावनांचा आदर केला गेला. मात्र आता झारखंड सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सारा जैन समाज प्रक्षुब्ध झाला आहे.
श्री समेद शिखरजी येथे पर्यटन विकास करण्याच्या घोषणेमुळे तेथे रिसॉर्ट, परमिटरूम, मांसाहारी खाद्यपदार्थ मिळण्याची सोय होऊन पर्यटनास कदाचित चालना मिळेलही मात्र शतकानुशतके जैन धर्मियांच्या दृष्टीने पवित्र स्थळ असणार्‍या श्री समेद शिखरजीचे पावित्र्य भंग पावेल हे निश्चित.
‘श्री समेद शिखरजी’वर श्रद्धा असणार्‍या अहिंसा, करूना, मानवता या उदात्त मुल्यांचा जय घोष करणार्‍या जैन समाजाने देश सेवा व लोकसेवेत नेहमीच मोठी मदत केली आहे.
झारखंड सरकारने श्री समेद शिखरजी येथे पर्यटन विकासाबाबत केलेली योजना मागे घ्यावी. व श्री समेद शिखरजी हे जैन धर्मियांचे पवित्र पूजास्थळ (Place of Worship) म्हणून घोषीत करावे अशी मागणी संपूर्ण जैन समाज करीत आहे. पुण्यातील मोर्चाचे प्रयोजन हेच आहे.
कळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *