गदिमांच्या स्मारकासाठी आबा बागुल यांची मदत मोलाची
श्रीधर माडगूळकरांनी व्यक्त केली अपेक्षा

नुकत्याच जन्मलेल्या बाळाची काहीच हालचाल नाही, रडणे नाही यामुळे त्याला मृत घोषित करण्यात आले होते. पण एक प्रयत्न म्हणून सुईणीने या बाळाच्या नाभीपाशी चटका दिला त्याक्षणी ते बाळ माणसात आले, ते बाळ म्हणजेच पुढे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी हा किताब मिळालेले ग.दि. माडगूळकर हे प्रतिभासंपन्न कवी. त्यांची जन्मशताब्दी यंदा साजरी होत आहे. पण त्यामागे त्यांच्या जन्माच्या वेळची ही महत्त्वपूर्ण घटना कारण आहे. ही आठवण गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांनी पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या कार्यक्रमात श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सांगितली.

पुणे नवरात्रौ महोत्सवात दुसऱ्या ‘माळेला’ ‘दैवी त्रिरत्ने’ हा गदिमा, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांच्या गीत आणि संगीताची सुंदर अनुभूती देणारा कार्यक्रम ‘स्वरानंद’ संस्थेने श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सादर केला. याप्रसंगी श्रीधर माडगूळकर सपत्नीक उपस्थित राहिले. महाराष्ट्रातील ग.दि.मा, बाबुजी, पु.ल यांच्या जन्मशताब्दीचे स्मरण ठेवून त्यांना पुणे नवरात्रौ महोत्सव समर्पित करण्यात आला आहे असे पुणे नवरात्रो महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष
नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले. यावेळी ग.दि. माडगूळकर, सुधीर फडके, पु.ल. देशपांडे आणि राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन श्रीधर माडगूळकर व आबा बागुल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्रीधर माडगूळकर यांनी समाधान व्यक्त केले. भीमसेन जोशी कलादालन आबा बागुलांनी अल्पावधीत पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून उभे करुन दाखविले. आबा बागुल आमदार असते तर गदिमांचे स्मारकही पूर्णत्वास गेले असते अशा भावना श्रीधर माडगूळकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी स्मारक प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरविले आहे. आबा तुमचे सहकार्य यास मिळावे त्यातून हा प्रकल्प तडीस जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना ग.दि.मां च्या जन्माच्या वेळची कहाणी श्रीधर माडगूळकर यांनी सांगितली. तसेच ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ गीत रामायणातील हे गीत पुणे आकाशवाणीच्या लाईव्ह कार्यक्रमाच्या काही तास अगोदर ग.दि.मां ना कसे सुचले आणि बाबुजींनी काही मिनिटे अगोदर त्या गीताला चाल कशी लावली त्याविषयीची या दोन महाकलावंतांच्या प्रतिभेची चुणूक दाखविणारी आठवणही सांगितली.

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन श्रीधर माडगूळकर आणि शिल्पकार विवेक खटावकर यांचा सत्कार करण्यात आला. सौ. माडगूळकर यांचा सत्कार निर्मला जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. स्वरानंद संस्थेच्या कलाकारांचा सत्कार श्रीधर माडगूळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे पदाधिकारी अमित बागुल, घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी उपस्थित होते.

ग.दि.मा, बाबुजी आणि पु.ल यांच्या गीत, संगीताचा कार्यक्रम स्वरानंद संस्थेने सादर केला. संजय गंभीर यांच्या सुश्राव्य निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. उपस्थित श्रोत्यांनी गीतांना वन्समोअरची दाद दिली. कार्यक्रमात सत्य शिवाहून सुंदर हे, जिवलगा कधी रे येशील तू, संथ वाहते कृष्णामाई, ह्रदयी प्रीत जागते जाणता-अजाणता, अशी पाखरे येती, दैवजात दुःखे भरता, नाच रे मोरा, जाळीमंदी पिकली करवंद आदी गीते सादर केली. गीत रामायणीत काही गीतांचे मुखडे सादर केले. साने गुरुजींच्या ‘बलसागर भारत होवो’ या विश्वात्मक देवाकडे केलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राजेंद्र उत्तुरकर यांनी बिगरी ते मॅट्रिक या पु.लं च्या कथाकथनातील काही भाग सादर केला.

स्वरानंदचे हेमंत वाळुंजकर, अभिजीत पंचभाई, श्रुती देवस्थळी या गायकांना पराग माटेगांवकर, अभय इंगळे, मिहीर भडकमकर आणि अभिजीत जायदे यांनी वादनाची साथ दिली.

फोटो : Pune Navratra Mahotsav News and Photo (1)
Pune Navratra Mahotsav News and Photo (2)

फोटो ओळ :

१) पुणे नवरात्रौ महोत्सवात गुरुवारी स्वरानंद संस्थेने दैवी त्रिरत्ने हा ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके आणि पु.ल. देशपांडे यांच्या विविध गीतांचा कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सादर केला.

२) पुणे नवरात्रौ महोत्सवात ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके, पु.ल. देशपांडे आणि राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन श्रीधर माडगूळकर यांच्या हस्ते गुरुवारी दैवी त्रिरत्ने कार्यक्रम प्रसंगी करण्यात आले. त्यावेळी सौ. माडगूळकर, महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, शिल्पकार विवेक खटावकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *