पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे शानदार उद्घाटन

‘प्रत्येक स्त्रीने स्वतःतील उर्जा ओळखावी’ –

अतिरिक्त आयुक्त शीतल उगले

प्रत्येक स्त्री मध्ये उर्जा असते. तिला सन्मान मिळायलाच हवा. मात्र केवळ नवरात्रापुरतेच हे मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभर स्त्रीचा सन्मान व्हायला हवा. स्त्री ने देखील स्वतःतील उर्जा ओळखावी. घर सांभाळून बाहेरही कर्तृत्व गाजवावे. घर हे पती-पत्नी अशा दोघांचे असते. घर, समाज आणि देश हा देखील स्त्री आणि पुरूष दोघांचा असतो. घरातील मुलगा आणि मुलगी यांना समान वागवा. आणि याची सुरूवात प्रत्येकाने आपापल्या घरापासून करावी असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी आज केले. 19व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदीर परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ‘माहेर’ मासिकाच्या कार्यकारी संपादक सुजाता देशमुख, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर आणि भोर येथील राज्य शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणार्‍या शीतल चव्हाण यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 5 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रारंभी महेश पाटील व सँडी ग्रुप यांनी गणेश वंदना आणि कलापद्मच्या कांचन रायकर व सह कलावंतांनी देवी स्तुती सादर केली. महिला महोत्सवाच्या पाककला स्पर्धांचे आयोजन करणार्‍या अंजली पुरानीक यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर देवीची सामुहिक आरती होऊन दीपप्रज्वललाने महिला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल उपस्थित होते.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा यासाठी महिलांसाठी हे व्यासपीठ सुरू झाले. गेल्या 19 वर्षात विविध स्पर्धांमध्ये हजारो महिला सहभागी झाल्या त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना माहेर मासिकाच्या कार्यकारी संपादक सुजाता देशमुख म्हणाल्या की, प्रत्येक महिलेने आपल्याला जे आवडते ते करण्यावर भर द्यावा. त्यातून खूप मोठे समाधान मिळते. जगताना हव्यास न बाळगता जेवढे आवश्यक तेवढेच स्वतः जवळ ठेवावे. आवडीचे काम केल्यामुळे प्रत्येकीचे आयुष्य समृद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर म्हणाल्या की, आपली आवड ओळखून त्याचीच निवड करा आणि मग त्यासाठी आपल्याला सवडही मिळेल. प्रत्येक महिलेने आपल्यातील शक्ती ओळखली पाहिजे. उद्योजक होण्यासाठी मिळालेली संधी दवडू नका. ध्येय, विक्री व्यवस्थापन व टीम वर्क या गुणांच्या आधारे महिला निश्चित यशस्वी उद्योजक होऊ शकतील अशा त्या म्हणाल्या.

भोर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणार्‍या शीतल चव्हाण म्हणाल्या की, वडिलांसमवेत जात राहिले आणि काम शिकत राहिले. अपघातात निधन पावलेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करताना मनात येत राहतं की यांना वेळीस वैद्यकीय मदत मिळाली असती तर हे जीव वाचले नसते का? सध्या रस्त्यात अपघात झाला तर लोक मदतीला जात नाही हे चुकीचे आहे, असे सांगून माणसाने माणूसकी टिकवली पाहिजे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कोळपकर यांनी केले. महोत्सवाच्या उपाध्यक्षा निर्मला जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास महिलांची मोठी गर्दी होती. यानंतर महोत्सवातर्फे ‘खेळ पैठणीचा’ संपन्न झाला. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी दीपा बागुल, छाया कातुरे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ :

Pune navratra mahotsav 1 : पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ‘तेजस्विनी’ पुरस्कार – नगरसेवक आबा बागुल, उपाध्यक्षा नीर्मला जगताप, अध्यक्षा जयश्री बागुल, शवविच्छेदक शीतल चव्हाण, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, मीनल मोहाडीकर, सुजाता देशमुख.

Pune navratra mahotsav 2 : पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे दीपप्रज्वललाने उद्घाटन झाले. त्याप्रसंगी डावीकढून अध्यक्ष जयश्री बागुल, निर्मला जगताप, शीतल चव्हाण, मीनल मोहाडीकर, सुजाता देशमुख, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त शितल उगले व आबा बागुल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *