परब्रह्माची सांगीतिक अनुभूती..

गायन वादन नृत्य यांना एकत्रितपणे संगीत असे म्हणतात. भारतीय शास्त्रीय संगीतात नाद आणि तालाला अतिशय महत्व आहे. नुकतीच पुणेकर रसिकांनी सरोद आणि तबल्याची सुरेल मैफल अनुभवली. सुश्रुत प्रस्तुत या मैफलीत ख्यातनाम सरोदवादक पं. शेखर बोरकर यांचे सुपुत्र अभिषेक बोरकर यांचे स्वतंत्र सरोद वादन सादर झाले. त्यांना तबल्याची दमदार साथ जेष्ठ तबलावादक पं.रामदास पळसुले यांची लाभली.तानपुर्यावर ऋषभ जोशी यांनी साथ केली.

तीन तासाच्या या मैफलीत सुरुवातीस सत्र १ मध्ये भीमपलास रागात आलाप जोड आणि रूपक तालात मध्य लयीत एक रचना सादर करून अभिषेक बोरकर यांनी रसिकांना जागीच खिळवळे. त्यातच जोडून द्रुत त्रितालातील अनोख्या रचनेने सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अतिशय अभ्यासपूर्ण आणि तयारीने अभिषेक यांनी प्रत्येक रागाची मांडणी आणि सादरीकरण केले.

त्यानंतर सत्र २ मध्ये राग मारव्यात विलंबित त्रितालातील रचनेने रसिकांनी वेगळीच स्वरानुभूती अनुभवली. त्यातच मध्य लयीत एक रचना बोरकर यांनी पेश केली.त्यानंतर अनवट आणि अतिशय अप्रचलित अशा हेमंत रागात झपताल आणि मध्य एकतालातील रचनांनी सर्व वातावरण स्वरमय झाले.मैफलीची सांगता त्रितालातील मध्यलयीतील सिंधू भैरवीने झाली .या मैफलीस अनेक दिगज्जांनी आपली हजेरी लावली. या मैफलीचे संजोजन गायक पं विजय कोपरकर यांनी केले.

फोटो ओळ :

१ सरोदवादक अभिषेक बोरकर यांसह मैफलीत तबलावादक पं रामदास पळसुले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *