30या पुणे फेस्टिव्हलमध्ये
‘बंगाल महोत्सव उत्साहात’ साजरा
30व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा प्रथमच पुण्यातील बंगाली नागरिकांनी आयोजित केलेला ‘बंगाल महोत्सव’ बालगंधर्व रंगमंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बंगाली असोसिएशन, पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास पुण्यातील बंगाली तसेच पुणेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपारिक बंगाली पेहेरावातील महिला व पुरुष सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. प्रखर देशभक्तीने प्रेरित झालेले व ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढणारे महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल हे 2 प्रांत अनोख्या धाग्याने एकत्र गुंफलेले येथे पाहायला मिळाले.
प्रारंभी दीप प्रज्वलन करून या ‘बंगाल महोत्सवा’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बंगाली असोसिएशन, पुण्याचे अध्यक्ष मिहीर दत्ता, बंगाल महोत्सवाचे संयोजक व परिचालक डॉ. समररॉय चौधरी, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू मंचावर उपस्थित होते. या नंतर बंगालच्या सांस्कृतिक परंपरांचे अनोखे दर्शन विविध नृत्याविष्कारातून सादर करण्यात आले. प्रारंभी या महोत्सवाचे संयोजक व परिचालक डॉ.समर रॉयचौधरी यांनी बंगालच्या सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेतला. विविध बंगाली लोकगीते व लोकनृत्यांवर सादर होणारा हा बंगाल महोत्सव महाराष्ट्रात आणि तोही लोकमान्य टिळकांच्या पुण्यात होत आहे याबद्दल त्यांनी पुणे फेस्टिवलला धन्यवाद दिले. यानंतर देबरती बासु व त्यांच्या सहकलावंतानी ‘त्रिवेणी’ हा कार्यक्रम सादर करून त्यातील गीतांच्या आधारे बंगाल मधील प्रखर राष्ट्रभक्तांच्या जीवनाचा आलेख उलगडून दाखवला. यामध्ये स्वातंत्र्यवीर, देशभक्त बंकिमचंद्र चटर्जी, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील सादर झालेला जीवनपट प्रेक्षकांना मोहित करून गेला. राष्ट्रध्वज हातात घेऊन सादर झालेले नृत्य आणि संगीत याला प्रेक्षकांनी आकाशाला भिडणारा गगनभेदी टाळ्यांचा कडकडाट केला. यानंतर बंगालमध्ये विशेषतः ग्रामीण बंगालमध्ये त्याकाळी असणार्‍या अंधश्रद्धेविरोधी नोबेल पुरस्काराचे मानकरी राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या अंधश्रद्धाविरोधी कवीतेवर आधारित ’देबोतार ग्राश’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. बाल कलाकार पुराहन पॉल व त्याची आई चैताली रॉयचौधरी यांनी यावेळी सादर केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. ’मातीर मानुष’ या कार्यक्रमाअंतर्गत बंगाली संस्कृतीचे प्रतीक असणारी लोकगीते व लोकनृत्ये सादर करण्यात आली. बंगालमधील दक्षिण-पश्चिम भागातील पुरुलिया जिल्ह्यातील आदिवासींचे छाऊ हे जोशपूर्ण लोकनृत्य सादर झाले. हे लोकनृत्य केवळ बंगालचा नव्हे तर नजिकच्या झारखंड ओरिसामध्येही लोकप्रिय आहे. चैत्र महिन्यात हे लोकनृत्य सादर करण्याची परंपरा आहे. पावसाळ्यामध्ये सादर होणार्‍या ‘भादू’ह्या लोकनृत्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ‘भातीयाली’हे गीत, बाऊल नृत्य हे देखील धार्मिक परंपरा सादर करणारे नृत्य यांना रसिक प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली. देशाच्या पूर्व भागात रुजलेले संथाल आदिवासी जमातीतील झुमुर हा नृत्याविष्कार आणि गौदिया हे प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य देखील कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
बंगालचा प्रसिद्ध ‘महिषासुरमर्दिनी दुर्गोत्सव’ हे कार्यक्रमाचे सर्वाधिक आकर्षण ठरले. पारंपारिक पद्धतीने केलेली दुर्गापूजा ही नेत्रांचे पारणे फेडणारी होती. यामध्ये वय वर्षे 2 पासून 78 वर्षांपर्यंतच्या सुमारे 60 बंगाली कलावंतानी सहभाग घेतला होता. पुण्यातील बंगाली असोसिएशनचे अध्यक्ष मिहीर दत्ता आणि या महोत्सवाचे संयोजक व परिचालक डॉ. समररॉय चौधरी व त्यांच्या असंख्य सहकार्‍यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच ’बंगाल महोत्सव’ सादर करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती.
याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू, उगवते तारे इंद्रधनुचे संयोजक रवींद्र दुर्वे यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलचे बालगंधर्व रंगमंदिर प्रमुख श्रीकांत कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे फिनोलेक्स ग्रुप आणि ईश्वर परमार ग्रुप हे प्रायोजक होते.

फोटो आणि फोटो ओळ –
1) Pune Festival – Bangal Mahotsav (1) : 30व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे ’बंगाल महोत्सव’ प्रथमच साजरा केला गेला. त्या कार्यक्रमाचे संयोजक व परिचालक डॉ. समररॉय चौधरी यांचा पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबत बंगाली असोसिएशन पुणेचे अध्यक्ष मिहीर दत्ता.
2) Pune Festival – Bangal Mahotsav (2) : पुणे फेस्टिव्हल बंगाल महोत्सव – ‘त्रिवेणी नृत्यविष्कार’.
3) Pune Festival – Bangal Mahotsav (3) : पुणे फेस्टिव्हल बंगाल महोत्सव – ‘देबोतर ग्राश’ नृत्याविष्कार.
4) Pune Festival – Bangal Mahotsav (4) : पुणे फेस्टिव्हल बंगाल महोत्सव – ‘दुर्गा’ नृत्याविष्कार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *