‘मुक्त संगीत चर्चासत्राची’ त्रितपपूर्ती

डॉ. अरविंद थत्ते, डॉ. सुचेता चापेकर, डॉ. सलील कुलकर्णी सहभागी

‘गानवर्धन’ संस्था ललित कला केंद्र गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहयोगाने संगीत साधकांच्या तसेच रसिकांच्या चिंतनात वृद्धी व्हावी, या हेतूने आयोजित करत असलेल्या ‘मुक्त संगीत चर्चासत्रात’ (निरूपणयुक्त संगीताविष्कार) ज्येष्ठ संवादिनीवादनकार डॉ. अरविंद थत्ते, नृत्यगुरू डॉ. सुचेता चापेकर व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी सहभागी होणार आहेत.

शुक्रवार दि. २७, शनिवार दि. २८ व रविवार दि. २९ जुलै २०१८ या तीन दिवशी रोज सायंकाळी ६ वाजता मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणे, पुणे ४ येथे संपन्न होणा-या या उपक्रमाचे हे त्रितपपूर्ती वर्ष असल्याचे गानवर्धनचे कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे यांनी कळविले आहे.

शुक्रवार दिनांक २७ जुलै २०१८ या पहिल्या दिवशी ज्येष्ठ संवादिनीवादनकार, गुरू डॉ. अरविंद थत्ते आपल्या ‘राग संगीतात श्रुती असंख्य’ या विषयाच्या माध्यमातून संवादिनी वादनात श्रुतींकडे बघण्याचे शास्त्रीय आणि सप्रयोग दृष्टिकोन, त्यांचा परस्पर संबंध सप्रयोग उलगडून दाखवतील. त्यांच्याशी डॉ. चैतन्य कुंटे संवाद साधणार आहेत.

शनिवार २८ जुलै २०१८ रोजी भरतनाट्यम नृत्यशैलीमध्ये स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविणा-या ज्येष्ठ नृत्यगुरू डॉ. सुचेता चापेकर ‘नृत्याभिनय’ या शीर्षकाअंतर्गत अभिजात नर्तनातील अभिनयवैशिष्टयांचे सर्वांगीण उकल करणारी सप्रयोग प्रस्तुती सादर करणार आहेत.

संत रचनांपासून…बाकीबाबा, आरती प्रभू, कुसुमाग्रज हृयांच्या अभिजात कवितांपासून…घराघरात, मनामनात रुजलेली बालगीते, लावणी पासून… रागमालेपर्यंत वैविध्य असणारे सर्जनशील संगीतकार, गायक, लेखक म्हणून सुपरिचित असलेले डॉ. सलिल कुलकर्णी ‘गाणे असे घडते’ या विषयाच्या माध्यमातून आपले विचार सप्रयोग मांडणार आहेत रविवार दि. २९ जुलै २०१८ रोजी.

त्यांना तबल्यावर आदित्य आठले यांची संगत असून संवादक आहेत मिलिंद कुलकर्णी.

पुण्यात गेली सलग ३६ वर्षे सातत्याने संगीतक्षेत्रातील दिग्गज कलावंतांनी आपले सांगीतिक विचारधन ‘मुक्त संगीत चर्चासत्राच्या’ व्यासपीठावरुन संगीतसाधकांसमोर मांडले आहे. गानवर्धनचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतील या उपक्रमास रसिकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

आत्तापर्यंत ३६ वर्षात सवाशेहून अधिक सप्रयोग भाषणे सादर झाली. त्यावर आधारित गानवर्धनने प्रकाशित केलेल्या मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील ग्रंथांनाही अभ्यासकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

आज त्रितपपूर्ती वर्षातही संगीत साधकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असलेल्या या कार्यक्रमांना तीनही दिवस प्रवेश विनामूल्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *