शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवाचे पद्मनी कोल्हापुरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

नृत्य आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ असणारा शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवाचे शानदार उद्घाटन रविवारी संध्याकाळी प्रख्यात अभिनेत्री पद्मनी कोल्हापुरे यांच्या हस्ते शनिवार वाडा प्रांगणात झाले.

पद्मनी कोल्हापुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या महोत्सवाचे यंदाचे १८ वे वर्ष आहे. या प्रसंगी संयोजन समिती सदस्य प्रसिध्द अभिनेते जॅकी श्रॉफ, सबिना संघवी,गायत्रीदेवी पटवर्धन, वर्षा चोरडीया, मनिषा साठे, नीलम शेवलेकर,पारुल मेहता, रेखा क्रिशन, राधा शेलाट, शमा भाटे, स्वाती दैठणकर, महेश मल्होत्रा, श्री रामचंद्र राव व समन्वयक विनेश परदेशी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमास रसिकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी पोलिसांनी सहकार्य केले.

यावेळी बोलताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या, शनिवार वाडा महोत्सवाला उपस्थित राहता आले याचा मनस्वी आनंद आहे. संजय लीला भन्साळी यांच्या पानिपत चित्रपटात मला काम करता आले आणि आज शनिवार वाड्याच्या साक्षीने होणाऱ्या शनिवारवाडा महोत्सवाला येता आले हा योगायोगच म्हणावा लागेल. असे सांस्कृतिक महोत्सव सातत्याने व्हायला हवे. हा सांस्कृतिक महोत्सव पुण्याचे वैभव आहे असेही त्या म्हणाल्या.

अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे. दरवर्षी होणारा शनिवार वाडा महोत्सव गेली १८ वर्षे सुरू आहे. पुणेकर रसिकांचा प्रतिसाद पाहून आमचा उत्साह अधिक द्विगुणित होतो.

महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ.स्वाती दैठणकर व त्यांच्या ‘नुपूरनाद’ च्या आदिती द्रविड, स्पृहा कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी, अनुजा चव्हाण, अनुजा बाठे, सानिका पोफळे, श्रुती अंबापकर,गौरी बुरडे, वैष्णवी पुणतांबेकर, राजलक्ष्मी बागडे व विवेकानंदा या ११ शिष्यांनी ‘गणेशवंदना’ सादर केली. याचे संगीत डॉ. धनंजय दैठणकर यांचे होते तर गायन पं. रघुनंदन पणशीकर यांनी केले होते.

त्यानंतर ‘महाभारत रीइंटरप्रीटेड – अतित की परछाईयाँ’ या नृत्य व संगीत यांचा सुंदर मिलाफ असणार्‍या १०५ मिनिटांच्या नृत्यसंरचनेने प्रेक्षकांना तृप्त केले. याची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन नृत्यगुरू पं. शमा भाटे यांचे आहे. एकून ७ नृत्य शैलींपैकी नाट्यमय ‘कथ्थक’मधून द्रौपदी – अमीरा पाटणकर, ‘कथकली’तून भीष्म – डॉ. कन्नन, ‘छाऊ’तून आक्रस्ताळा आणि शीघ्रकोपी दुर्योधन – राकेश साई बाबू, ‘कुचिपुडी’तून सहनशील कुंती – वैजयंती काशी, ‘मोहिनीअट्टम’ मधून गांधारी – गोपिका वर्मा, ‘ओडिसी’तून धोरणी युधिष्ठिर – रामली इब्राहिम आणि ‘भरतनाट्यम’मधून कर्ण – वैभव आरेकर या व्यक्तिरेखा वेशभूषा आणि संगीतासह वैविध्यपूर्ण शैलीतून महाभारताच्या कथानकाचा पट मांडण्यात आला. ‘नादरूप’ या संस्थेच्या शिष्या भरतनाट्यम पूर्वा सारस्वत, स्वरदा दातार आणि इशा पिंगळे यांनी भरतनाट्यम, छाऊ नृत्यामध्ये झहीद परवेझ, रजनीकांत मोहंती आणि फिलीप केविन यांनी तर कथक मध्ये विदुला हेमंत, अवनी गद्रे, रागिणी नागर, शिवानी करमरकर, अनुजा क्षीरसागर, शांभवी कुलकर्णी, आर्या शेंदुर्णीकर आणि भार्गवी सरदेसाई या सहकलाकारांनी मुख्य नृत्य विशारदांना साथ दिली.

अतिशय तालबद्ध नृत्य, श्रवणीय संगीत आणि एकरूप झालेल्या भावमुद्रा या आधारे सादर झालेल्या या नृत्य व संगीत कार्यक्रमात, यातील भिन्न नृत्यशैलींना वेगवेगळे संगीत देण्यात आले होते. नरेंद्र भिडे यांनी संगीतरचना तर अनुरूप प्रकाशयोजना हर्षवर्धन पाठक व सचिन लेले यांनी केली होती.

मानवी जीवनातील गुंतागुंतीचे, सर्वार्थाने वेध घेणारे महाभारत हे खर्‍या अर्थाने महाकाव्य आहे. पराकोटीचे दुःख, औदार्य, सूड, सहानुभूती, विफलता आणि शांतता या सार्‍यांचा अनुभव या सादरीकरणाद्वारे रसिकांनी घेतला. या नृत्यसंरचनेमध्ये महाभारतातील काही महत्वाच्या व्यक्तिरेखांना एकत्र गुंफण्यात आले आहे. या व्यक्तीरेखा त्यांच्या जीवनातील अखेरच्या टप्प्यावर आहेत. त्यांच्या जीवनात प्रचंड मोठी उलथापालथ झाल्यानंतर आपल्या सर्व प्रिय व्यक्ती आणि संपत्तीचा नाश झाल्यावर ते मागे वळून पाहत आपल्या जीवनाचे तटस्थपणे परीक्षण करीत आहेत. अचानकपणे त्यांना तो विजय निष्फळ आणि पराभव निरर्थक वाटू लागतो. “येवढा महाविनाश होण्यास मी कारणीभूत झाले आहे काय? आणि हा असा महाविनाश टाळता आला नसता काय?” असाच प्रश्न यातील प्रत्येक व्यक्तीरेखा विचारत राहते. या एकाच कथानकात भिन्न नृत्य शैलींचा एकत्रित अविष्काराने रसिकांच्या मनाला मोहित केले. टाळ्यांच्या कडकडाट नृत्य संरचनेची सांगता झाली.

यंदाच्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक इंडो स्कॉटले अ‍ॅटो पार्टस प्रा.लि. होते. झाला ग्रूप, फाईव्ह एफ वर्ल्ड, वेकफिल्ड, रेडिओ वन आणि प्युअर गोल्ड फाईन चॉकलेट हे सहप्रायोजक होते.

फोटो ओळ- १ व २) –१८ व्या शनिवार वाडा नृत्य व संगीत महोत्सवाचे दीपप्रज्वलनाने प्रसिध्द अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी डावीकडून राधा शेलाट, सबिना संघवी, गायत्रीदेवी पटवर्धन, नीलम शेवलेकर, जाकी श्रॉफ, पद्मिनी कोल्हापुरे, रेखा क्रिशन, वर्षा चोरडिया, श्री रामचंद्र राव, महेश मल्होत्रा.

फोटो ३ व ४–जेष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर व त्यांच्या नुपुरनाद संस्थेच्या ११ शिष्यांनी गणेशवंदना सादर केली.

फोटो ५–११ ‘महाभारत रीइंटरप्रीटेड – अतित की परछाईयाँ’ या नृत्य व संगीत यांचा सुंदर मिलाफ असणार्‍या नृत्य संरचेनेत सादर झालेले नृत्य अविष्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *