चित्रपट- ‘ट्रान्सलेटर’- दिग्दर्शक रॉड्रिगो बॅरिओसो व सबॅस्टिअन बॅरिओसो.

यांपैकी सबॅस्टियन बॅरिओसो पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. क्यूबात राहणा-या रशियन भाषेच्या एका प्राध्यापकाला स्थानिक रुग्णालयात बालरुग्ण विभागात भाषांतरकार म्हणून काम करावे लागते. चेर्नोबिल दुर्घटनेच्या परिणामांमुळे कर्करोग झालेल्या बालरुग्णांबरोबर राहताना त्याच्या विचारांवर व कौटुंबिक जीवनावरही दूरगामी परिणाम होतो, याची गोष्ट ‘ट्रान्सलेटर’ या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.

सबॅस्टियन बॅरिओसो म्हणाले- या चित्रपटात मी क्यूबात लहानाचा मोठा होत असतानाचे माझ्या अनुभवांचे प्रतिबिंब आहे. या कमी खर्चात बनलेल्या चित्रपटाचे चित्रिकरण आम्ही २५ दिवसांत पूर्ण केले. जगभरातील लोक चित्रपट पाहताना त्यातील भावनांशी स्वतःला जोडून पाहतात. आम्ही ज्या-ज्या देशांत हा चित्रपट दाखवला त्या सर्व ठिकाणी आम्हाला प्रेक्षकांचा एकसारखाच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा चित्रपट बनवताना या भावना फार महत्त्वाच्या असतात.

———-

चित्रिपट- ‘टू मच इन्फो क्लाऊडिंग ओव्हर माय हेड’- दिग्दर्शक- व्हॅसिलिस ख्रिस्तोफिलॅकिस

चित्रपटाचे संकलक जॉर्जोस अलेफँटिस पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. हा ग्रीसमधील एक विनोदी चित्रपट आहे.

जॉर्जोस अलेफँटिस म्हणाले की, या चित्रपटाचे साऊंड डिझाईन फार महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या ध्वनीयोजनेसाठी खूप कलात्मकता लढवावी लागते आणि जवळपास एक महिना आम्ही साऊंड डिझाईनची ही प्रक्रिया करत होतो. तुमच्याकडे कलात्मकता असेल तर आताच्या काळात चित्रपट बनवणे फारसे अवघड राहिलेले नाही. साध्या कॅमे-याच्या साहाय्याने मित्रांना बरोबर घेऊन कुणीही चित्रपट करू शकते. आम्हीही आमच्या चित्रपटाचे संकलन स्टुडिओत नव्हे तर घरीच केले आहे.

———–

चित्रपट- ‘टू लेट’- दिग्दर्शक- चेझियन रा

चेझियन रा हे स्वतः पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.

ते म्हणाले, की मला २००७ मध्ये चेन्नईतील घर सोडावे लागले आणि घराचा शोध सुरू करावा लागला. चेन्नईत माहिती तंत्रज्ञान कंपन्या खूप असून त्यामुळे घर शोधणे ही एक समस्या आहे. आयटी कंपन्यांमध्ये काम करणा-यांकडे पैसा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्याकडून अधिक भाडे मिळेल अशी घरमालकांचीही अपेक्षा असते. माझा अनुभव आणि हा आताही दिसणारा प्रश्न मी चित्रपटात मांडला. या चित्रपटातील अभिनेते हे मूळचे चित्रपटातील अभिनेते नव्हते. तसेच बरेचसे चित्रीकण आम्ही रस्त्यांवर कॅमेरा लपवून ‘गोरिला शूटिंग’ पद्तीने समोर प्रत्यक्ष घडणा-या गोष्टी चित्रित केल्या आहेत.

———

चित्रपट- ‘पांगशू’, दिग्दर्शक- विसाकेसा चंद्रसेकरम

दिग्दर्शक विसाकेसा चंद्रसेकरम व अभिनेत्री नीता फर्नांडो पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.

विसाकेसा चंद्रसेकरम- आपण सर्वजण एक प्रकारे मातीतून आलो आहोत आणि एक दिवस मातीतच सामावणार आहोत हा या चित्रपटातील मूळ विचार आहे. एका स्त्रीला जेव्हा आपले मूल गमवावे लागते तेव्हा तिची मानसिक स्थिती काय होत असेल या स्त्री पात्रांच्या मानसिक आंदोलनांमधून मी माझ्या चित्रपटाची गोष्ट मांडली आहे.

नीता फर्नांडो- मी अनेक चित्रपटांत काम केले आहे, परंतु माझ्यासाठी या चित्रपटातील भूमिका सर्वांत आव्हानात्मक होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *