पिफ फोरमच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी व ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी मुलाखत घेतली. तत्पूर्वी निहलानी यांच्या हस्ते पिफ फोरमचे उद्घाटन करण्यात आहे. महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता या वेळी उपस्थित होते.

निहलानी यांना यंदा ‘पिफ’मध्ये ‘पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले, तर हट्टंगडी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

या मुलाखतीतील प्रमुख मुददे खालीलप्रमाणे-

गोविंद निहलानी-

– आता सर्व गोष्टी ‘डिजिटल’ झाल्या आहेत, परंतु बदलते तंत्रज्ञान हे काम अधिकाधिक चांगले व्हावे यासाठीच असते, त्यामुळे आपण ते कायम स्वीकारायला हवे. सुरूवातीला आम्ही ‘सेल्युलॉईड’ माध्यमात चित्रपट बनवत असू आणि त्या माध्यमात बनलेला चित्रपट पाहणे हा एक निराळा आणि सुंदर अनुभव होता. तंत्रज्ञान नेहमीच आपल्याला ‘क्रिएट ऑर पेरिश’ असे आव्हान देत असते. परंतु आताचे नवीन तंत्रज्ञान उत्तम असून प्रतिमानिर्मितीचे नवे आयाम त्यामुळे खुले झाले आहेत.

– माझ्या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन तयार होण्यात ज्येष्ठ नाटककार व लेखक विजय तेंडुलकर यांचा मोठा वाटा आहे. लेखक म्हणून त्यांच्या कामात सखोलता होती. मला तर त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालेच, परंतु भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. परंतु माझ्या मते त्यांना त्यासाठी अपेक्षित ओळख मिळाली नाही.

– रिचर्ड अटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटसाठी ‘सेकंड युनिट’ दिग्दर्शक म्हणून माझी निवड होईल असे वाटले नव्हते. तोपर्यंत ‘आक्रोश’ हा माझा एकच चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु त्यांच्या चमूने माझा चित्रपट बारकाईने पाहिला होता. ‘गांधी’साठी काम करताना व्यवस्थापनाचे उत्तम धडे मला मिळाले. या चित्रपटाची पटकथा चित्रपटाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने वाचायला हवी. तीन तासांत महात्मा गांधीचे ८० वर्षांचे आयुष्य बसवणे ही सोपी गोष्ट नाही.

– कलात्मक लिखाणात लेखकाची स्वतःची विचारप्रक्रिया फार महत्त्वाची असते आणि ती कुणीही तुम्हाला शिकवू शकत नाही. तुमच्यातच ती असायला हवी.

– (आजचे सामाजिक प्रश्न, नयनतारा सहगल यांचा विषय अशा विवध विषयांवर निहलानी यांना त्यांचे मत विचारले गेले. या विषयी बोलताना त्यांनी कुणाविषयीही थेट भाष्य न करता असे सांगितले की,)

जसा काळ बदलतो तसे सामाजिक प्रश्न सतत विकसित होत असतात. भारतीय लोकशाही ही स्थिर (स्टॅटिक) नाही, तर गतीशील स्वरूपाची (डायनॅमिक) आहे. त्यामुळे आपली लोकशाही सातत्याने विकसित होत असते. आपण याच संक्रमणावस्थेतून जात आहोत आणि गतीशील लोकशाही हा सध्याचा सर्वांत मोठा प्रश्न आहे.

रोहिणी हट्टंगडी-

– काही वेळा अभिनेत्यावर तंत्रज्ञानाचा पगडा मोठा होतो असे दिसून येते. परंतु आपली भूमिका समजून घेऊन ती विकसित करता येणे अभिनेत्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असते. तंत्रज्ञान नंतर शिकून घेता येते.

– मी आत्ता जी काही आहे त्याचे श्रेय ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधील (एनएसडी) शिक्षणाला आहे. ‘एनएसडी’त असताना मी शिडीवर चढून लाईटस् बदलणे, सुतारकामाच्या विभागात काम करणे, हे सर्व केले आहे. या संस्थेने मला नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या सगळीकडे काम करताना गरजेची असलेली दृष्टी दिली. इब्राहिम अल्काझी हे परिपूर्ण शिक्षक होते. त्यांनी आम्हाला शिस्त शिकवली. ‘एनएसडी’च्या स्कूल प्रॉडक्शन प्रयोगांमध्ये आम्हाला ‘क्राऊड सीन’मध्ये अगदी गर्दीतील व्यक्तीचे काम करायचे असले तरी त्या व्यक्तीची भूमिका तुम्ही तुमच्या मनात उभी करायला हवी, असे अल्काझी सांगत.

– माझी ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबांच्या भूमिकेसाठी निवड झाली तेव्हा सुरुवातीला माझ्यासाठी ती केवळ एक भूमिका होती. गांधींची भव्यता तेव्हा मला तोपर्यंत जाणवली नव्हती. पण चित्रिकरणापूर्वी मी कस्तुरबांविषयी अधिकाधिक माहिती करून घेण्यास सुरूवात केली. ‘गांधी’ हा माझा चौथाच चित्रपट होता आणि माझ्यासह भक्ती बर्वे आणि स्मिता पाटील या उत्तम अभिनेत्रींच्याही या भूमिकेसाठी मुलाखती झाल्या होत्या. परंतु अटनबरो यांना मी कस्तुरबांच्या भूमिकेच्या जवळ जाणारी वाटल्याने ती भूमिका मला मिळाली. ‘गांधी’च्या सेटवर प्रचंड शिस्त होती. ‘हो जाएगा’ला जागा तिथे नव्हती. नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना मात्र या ‘हो जाएगा’चा अनुभव मी घेतला. अर्थात आता गोष्टी बदलल्या असून शिस्त आली आहे.

– ‘सारांश’ हा चित्रपट आमच्या सगळ्यांच्या जवळचा होता. ‘सारांश’ व ‘गांधी’ या दोन्ही चित्रपटांत मी माझ्या वयापेक्षा खूप मोठ्या वयाच्या व्यक्तींच्या भूमिका साकारल्या, परंतु भूमिका कोणती आहे यापेक्षा मला त्यात काय करायला मिळते आहे हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. —

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *