मंगेशकर हे संगीत क्षेत्रातील “स्वयंभू” कुटुंब – डॉ. शंकर अभ्यंकर

सूर्याला कसं उगवावं…कसा प्रकाश द्यावा हे कोणीही त्याला सांगू शकत नाही. त्याचं तोच ठरवतो. तसंच कोणत्याही चौकटीत न बसणारं गाणं मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे होते. श्रीकृष्णाच्या वेणू आणि देवर्षि नारद यांची वीणा यांच्या स्वरांचे सार लतादीदींच्यात आहे. या सांगितिक क्षेत्रात मंगेशकर जे करतील ती पूर्व दिशा असते, म्हणूनच संपूर्ण मंगेशकर कुटुंब हे संगीत, गायनाच्या क्षेत्रातील स्वयंभू कुटुंब आहे, असे गौरवोदगार विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी आज येथे काढले.
मास्टर दीनानाथ यांच्या ७५ वी पुण्यातिथी आणि लता मंगेशकर यांच्या गायनाची ७५ वर्षे असे दुहेरी औचित्य साधून “स्वरप्रतिभा” चा यंदाचा दिवाळी अंक या दोघांवर काढण्यात आला आहे. या अंकाचे प्रकाशन डॉ. अभ्यंकर यांच्या हस्ते लोकमान्य सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उल्हासदादा पवार होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून अंकाला शुभआशिर्वाद दिले. व्यासपीठावर अंकाचे संपादक प्रवीण प्र. वाळिंबे, सहसंपादिका शैला दातार आणि संपादक मंडळातील सदस्य डॉ. वंदना घांगुर्डे, मधू पोतदार आणि शशिकांत पंडित उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शैला दातार यांनी भारत गायन सामाजाच्यावतीने दीनानाथांवर तयार केलेली स्वरमंगेश ही चित्रफित दाखवण्यात आली.
डॉ. अभ्यंकर म्हणाले, संगीत हा एक महासागर आहे, ही एक शक्ती आहे. संगीतात अनेक घराणी निर्माण झाली. या कोणत्याही चौकटीत न मावणारे, बसणारे गाणं हे दीनानाथांचे होते. घडवायचा म्हणून गायक हा घडवता येत नसतो तर तो जन्माला यावा लागतो. मास्टर दीनानाथ यांच्या गायनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची राष्ट्रभक्ती, जी त्यांनी गायनातूनही दाखवून दिली. ब्रिटिश अधिका-यांसमोर परवशता पाश दैवे……गाणं म्हणून ब्रिटीश कसे अन्याय अत्याचार करतात हे त्यांनाच ऐकवण्याचे आत्मबल लागते दीनानाथांकडे होते.
श्रीकृष्णाची वेणू आणि नारदांची वीणा यांच्या स्वरांच सार ललादिदींच्यात आहे. त्यांचा स्वर निसर्गदत्त आहे असे सांगून डॉ. अभ्यंकर म्हणाले, तीन सप्तकांवर स्वर लावले जातात. त्यामुळे तीन प्रकारांनी गाणं म्हणता येतं. कोणी सप्तक बघू गातात तर कोणी स्वरांनी गातात. पण श्रृतीनं गाणारी एकमेव गायिका आहे ती म्हणजे लतादिदी. दीनानाथ, लतादिदी आणि सर्वच मंगेशकर भावंड हे मंगेशकर कुटुंबिय जे करतील ती पूर्व दिशा असेच समीकरण झालेले असल्याने मंगेशकर कुटुंब हे स्वयंभू कुटुंब आहे आणि आपल्याला त्यांचे गाणं ऐकालायला मिळालं म्हणून आपणही भाग्यवंत आहोत. यावेळी त्यांनी अंकातील काही लेखामधील आठवणीही सांगितल्या.
उल्हास पवार म्हणाले, आपण दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी उटणं लावतो, अभ्यंगस्नान स्नान करतो, खमंग फराळाचा आस्वाद घेताना जोडीला दिवाळी अंक वाचण्यातही तिच रूची वर्षानुवर्षे दाखवत आहोत. मास्टर दीनानाथ आणि लतादिदी, आशाताई, उषाताई, मीनाताई आणि पं. हृदयनाथ या भावंडांनी वडिलांसारखेच आपापले स्वत:चे स्थान या क्षेत्रात निर्माण केले आहे. त्यांनी समर्पित भावनेने ही परंपरा जपली, जगवली आणि हाच वारसा आता राधा मंगेशकर पुढे चालवत आहेत. यावेळी त्यानी आळंदी येथील ६९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्य उदघाटक म्हणून लतादिदींनी केलेल्या भाषणाच्या आठवणीही सांगितल्या.
अंकाचे संपादक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितले की, स्वरप्रतिभाचा हा १३ वा दिवाळी अंक असून मी संगीतावरील दिवाळी अंक काढावे ही माझ्या वडिलांची प्रेरणा होती. मागिल दिवाळी अंकाचा आढावा घेऊन, दिवाळी अंक ही सांस्कृतिक, साहित्यिक चळवळ असून ती लोकाश्रयामुळे शंभरवर्षाहून अधिक काळ टिकली आहे. दिवाळी अंकांचे आर्थिक गणित जमवणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने दिवाळी अंकांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. एबीसीचे लेखापरिक्षण करून दिवाळी अंकाना शासनाने जाहिराती द्याव्यात. ही मागणी उल्हासदादांनी शासनाकडे न्यावी अशी विनंतीही त्यांनी केली. कार्यक्रमाची सुरूवात तन्मयी मेहेंदळे हिने म्हटलेल्या शारदा स्तवनाने झाली. या दिवाळी अंकासाठी योगदान देणा-यांचा सत्कार यावेळी पाहुण्यांच्या हस्ते कऱण्यात आला. संगीत रसिकांनी मोठ्य़ा संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली. अनेक रसिकांनी यंदा मिठाई ऐवजी स्वरप्रतिभाचा मंगेशकर विशेषांक दिवाळीत देण्यासाठी भेट देण्यासाठी कार्यक्रमानंतर मोठ्या संख्येने खरेदी केले.

फोटो ओळ – स्वसप्रतिभा दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रसंगी डावीकडून सहसंपादिका शैला दातार, संपादक प्रवीण प्र. वाळिंबे, विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, उल्हास पवार आणि डॉ. वंदना घांगुर्डे.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>